खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयामार्फत दि. ११ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेसाठी कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील खारेपाटणपासून अगदी जवळ असलेल्या वायंगणी या गावच्या विद्यमान लोकनियुक्त महिला सरपंच अस्मि प्रशांत लाड यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधीमधून ही निवड करून सदर यादी केंद्र शासनाकडे पाठविली आहे. यामध्ये कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी गावच्या सरपंच अस्मि प्रशांत लाड यांना मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हयासह कणकवली तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेसाठी अस्मि लाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस देखील शुभेच्या देण्यात येत आहेत.











