महिला ग्रामसभेत विधवा महिलेला दिला न्याय
पतीच्या निधनानंतर त्या महिलेचे उतरवलेले अलंकार पुन्हा घातले
करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांचा धाडसी निर्णय ; जिल्ह्यात उपक्रमाचे होतेय कौतुक
वैभववाडी प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने समाजाला सकारात्मक संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य निर्णय घेण्यात आला. पार पडलेल्या महिला ग्रामसभेत गावातील शरयू दीपक जामदार या विधवा महिलेचे पतीच्या निधनानंतर उतरवलेले सर्व अलंकार पुन्हा परिधान करून देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामसभेत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सरपंच नरेंद्र कोलते यांच्या या धाडसी निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
समाजात अनेक ठिकाणी विधवा महिलांना पारंपरिक रूढींमुळे अनेक सामाजिक बंधने पाळावी लागतात. मात्र करुळ ग्रामपंचायतीने या रूढींना छेद देत विधवा महिलेलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. पतीच्या निधनानंतर शरयू जामदार हिचे सर्व अलंकार काढून ठेवण्यात आले होते. जागतील महिला दिनी पार पडलेल्या महिला ग्रामसभेत तिचे ते अलंकार उपस्थित महिलांनी तिच्या अंगावर घातले. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले.
महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली. उपस्थित महिलांनी शरयू जामदार हिला वाण देत तिचा सन्मान केला. यावेळी शरयू जामदार हिच्या इयत्ता सातवी व पाचवीत शिकत असलेल्या दोन्ही मुली उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
यावेळी सरपंच नरेंद्र कोलते व पंचायत समितीचे अधिकारी संतोष टक्के यांच्या वतीने शरयू जामदार हिला स्वावलंबी होण्यासाठी शिलाई मशीन भेट देण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने तिला साडी भेट देण्यात आली. महिला दिनानिमित्त घेतलेल्या या निर्णयामुळे करुळ ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानाचा आणि सामाजिक समतेचा आदर्श घालून दिला आहे. गावातील ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. समाजातील जुन्या रूढींना बदलण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. पं. स. सदस्या साची कोलते, निशिगंधा माळकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या शुभ कार्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, संतोष टक्के, साची कोलते शशिकांत गुरव, सिंधुताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, पंचायत समितीचे कक्ष अधीक्षक संतोष टक्के, उपसरपंच भास्कर सावंत, पंचायत समिती सदस्या साची कोलते, ग्रा. प. सदस्य सचिन कोलते, रेखा सरफरे, दिपाली जामदार, रोहिणी लाड, निशिगंधा माळकर, शशिकांत गुरव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











