फोंडाघाट महाविद्यालयात हवामान बदलावर आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषद; देश-विदेशातील ८५ संशोधकांचा सहभाग
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटच्या आयक्यूएसी विभाग आणि कोकण जिओग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “हवामान बदलातील संशोधन कल आणि त्याचा शेती, लोकसंख्या व नैसर्गिक संसाधनांवर होणारा परिणाम” या विषयावर आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. देश-विदेशातील संशोधकांनी या परिषदेत सहभागी होत विविध संशोधन निष्कर्ष सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी करून दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश सावंत आणि सचिव चंद्रशेखर लिंग्रस यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परिषदेचा आढावा घेताना प्राचार्य पुरंधर नारे यांनी सांगितले की, शेती, लोकसंख्या, हवामान बदल आणि मानवी आरोग्य या विषयांवरील परिणामांचा गांभीर्याने विचार करून शाश्वत विकासासाठी संभाव्य उपाय शोधण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
परिषदेत प्रमुख वक्ते अब्दुल वकील यांनी शैक्षणिक चर्चेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, विद्वान संशोधक आणि व्यावसायिकांमध्ये ज्ञान, संशोधन आणि अनुभवांची देवाणघेवाण होणे आवश्यक असून त्यातून अर्थपूर्ण सहकार्याला चालना मिळते. त्यांनी अफगाणिस्तानातील हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले. दुष्काळ, पूर, अन्न असुरक्षितता, जलजन्य रोग आणि मर्यादित आरोग्यसेवा उपलब्धता यामुळे ग्रामीण लोकसंख्या अधिक असुरक्षित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतातील आरोग्यसेवा उपलब्धतेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक-आर्थिक घटकांचे त्यांनी विश्लेषण सादर केले.
फेयॉम विद्यापीठ, कैरो (इजिप्त) येथील डॉ. मोहम्मद अझीझ यांनी भू-स्थानिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जलविज्ञान मॉडेलिंग यांचे एकत्रीकरण करून अचानक येणाऱ्या पुरांचे विश्लेषण आणि अति-शुष्क प्रदेशांतील दुर्मिळ जलसंपत्तीचे व्यवस्थापन यावर संशोधन सादर केले. सेंटिनेल उपग्रह प्रतिमा आणि रिमोट सेन्सिंग डेटा वापरून दक्षिण इजिप्तमधील पूर जोखीम मॅपिंग आणि जलाशयासाठी योग्य स्थळांची ओळख कशी पटवता येते याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कोकण जिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिवराम ठाकूर यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की, मानवी क्रियांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून हवामान बदलामुळे मानवी जीवनास गंभीर धोके निर्माण होत आहेत. तेल, गॅस आणि कोळशाच्या वाढत्या वापरामुळे हवामानात झपाट्याने बदल होत असल्याने जागतिक तापमानवाढ रोखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेचे अध्यक्ष फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत यांनी तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर सर्वच क्षेत्रात प्रगती झाली असली तरी हवामान बदल ही २१ व्या शतकातील मोठी जागतिक समस्या ठरली असल्याचे सांगितले. याचा परिणाम मानवी आरोग्य, शहरीकरण, शेती व मत्स्यपालन या क्षेत्रांवर होत असून अशा परिषदांमुळे तज्ज्ञांच्या चर्चेतून समाजाला उपयुक्त दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
या परिषदेत नायजेरियातील ओई सुवारे, इनिबेही अकपोंग, डॉ. उगोचिको अकपोंग, जान्वियर (बुरुंडी), पूर्व आफ्रिका तसेच गोव्याचे प्रा. डॉ. प्रबिरकुमार रथ हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. जॉर्जिया, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ तसेच भारतातील मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांतील संशोधकांनी सहभाग नोंदवला. परिषदेत २५ संशोधकांनी ऑनलाईन तर ६० संशोधकांनी ऑफलाईन उपस्थित राहून एकूण ८५ संशोधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. विनोदसिंह पाटील यांनी आभार मानले.













