कणकवली (प्रतिनिधी) : 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वाघेरी मठखुर्द येथे महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये महिलांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. तसेच ग्रामपंचायत कार्यालय ते शाळा नंबर एक पर्यंत प्रभातफेरीत फुगडी व लेझीम नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांकडून सकाळच्या सत्रात प्रभात फेरी झाल्यानंतर UPI पेमेंट बाबत मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्नेहाभोजनाचा कार्यक्रम पार पडला व दुपारच्या सत्रात कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी पंचायत समिती कणकवलीच्या सन्माननीय सभापती हर्षदा वाळके तसेच पंचायत समिती सदस्य मानसी मराठे व सिने अभिनेत्री अक्षता कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अक्षता कांबळी यांना कलाकार क्षेत्रात व स्नेहलता जगदीश राणे यांना शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात, तर श्रुती श्रीकांत राणे यांना आरोग्य क्षेत्रात व गोजिरी गोडे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे महिलांसाठी अतिशय चांगला कार्यक्रम राबवून महिला संघटित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दक वाघेरी गावाच्या वतीने महिलांनी सरपंच अनुजा राणे यांचाही सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत वाघेरीच्या विद्यमान सरपंच अनुजा अनंत राणे, उपसरपंच स्नेहल मंगेश नेवगे, ग्रामपंचायत सदस्य निधी राणे तसेच उमेदच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला जवळपास 200 महिला उपस्थित होत्या. तसेच दुपारनंतरच्या सत्रात महिलांसाठी हळदीकुंकू व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. सर्व उपस्थित महिलांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला महिलांना विविध बक्षीसांचे वाटप देखील ग्रामपंचायत वाघेरी मठखुर्द मार्फत करण्यात आले. सिने अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष् वेधले तसेच अक्षता कांबळी यांनी आपल्या खास मालवणी शैलीतून महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे देखील योगदान लाभले. अशा या उपक्रमाबाबत ग्रामपंचायत वाघेरी मठखुर्दचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.










