श्रीदेव पाचोबा देवस्थान डामरेच्या वतीने रामनवमी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

संगीत जुगलबंदीसह लकी ड्रॉ व रिल स्पर्धा ठरणार आकर्षण

कणकवली (प्रतिनिधी) : डामरे येथील श्री देव पाचोबा देवस्थान येथे रामनवमी उत्सवानिमित्त यंदा विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव पाचोबा मित्रमंडळ, डामरे यांच्या वतीने २६ मार्च २०२६ रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने रात्री १० वाजता नादबंधन ग्रुप कणकवली आयोजित संगीत जुगलबंदी कार्यक्रम रंगणार आहे.

या कार्यक्रमात गायक चिन्मय सावंत, रोहित सरनोपत आणि जयेश घाडी हे आपली कला सादर करणार असून तबल्यावर पंकज सावंत, मृदंगमणी म्हणून संदीप मेस्त्री तर निवेदनाची धुरा राजा सामंत सांभाळणार आहेत. याचबरोबर भाविक आणि ग्रामस्थांसाठी आकर्षक लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांसाठी मोबाईल, सायकल, कूलर, टेबल फॅन, इस्त्री, साड्या, बॅग, बेडशीट, टॉवेल व नॅपकिन अशा विविध बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोडत गुरुवारी रात्री १२ नंतर काढण्यात येणार आहे.

तसेच, रामनवमी उत्सवानिमित्त रिल स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. १५,५५५/-, रु. ७,५५५/- व रु. ३,५५५/- अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 9423682448, 7722056111 आणि 9403558171 या संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

या रामनवमीच्या उत्सवात ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देव पाचोबा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!