पावशीत मुंबई-गोवा हायवेवर टायर जाळले

अज्ञाताच्या कृत्याने पोलिसांची धावपळ

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी पावशी-घावनळे फाट्याजवळ अज्ञातांनी टायर पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. ऐन महामार्गावरच टायरला आग लावल्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. आज (सोमवारी) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पावशी-घावनळे फाट्याजवळ अज्ञातांनी महामार्गावर टायर आणून पेटवून दिले. आगीमुळे आणि धुरामुळे या मार्गावरील वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला. एका बाजूच्या लेनवरील वाहतूक थांबल्याने महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एकीकडे महामार्गावर नांदगाव येथे आंबा बागायतदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाची धग सुरू असतानाच दुसरीकडे कुडाळजवळील पावशी येथे अज्ञातांकडून टायर पेटवण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार बागायतदारांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे की यामागे आणखी काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामार्गावर टायर पेटवल्याची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कार्यवाही सुरू केली असून, यामागे नेमके कोण अज्ञात आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

error: Content is protected !!