एचआयव्ही बाधित असल्याचे चुकीचे निदान; मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरू

ओरोस (प्रतिनिधी) : एचआयव्ही बाधित असल्याचे चुकीचे निदान केल्यानंतर मृत पावलेल्या कै. गणपत सहदेव राणे यांच्या पत्नी आणि मुलग्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या प्रकारामुळे केवळ मृत्यूच नव्हे तर कुटुंबाची समाजात बदनामीही झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

चुकीच्या उपचारांमुळे व खोडसाळ निदानामुळे कै. गणपत सहदेव राणे यांचा १३ नोव्हेंबर २०२५ रोजी निष्पाप बळी गेला होता. ओसरगाव येथील एका स्वयंसेवी संस्थेने आरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्यात हे चुकीचे निदान करून संबंधित करून त्यांना एचआयव्ही बाधित घोषित करण्यात आले होते. त्यानंतर कै राणे यांच्यावर उपचार सुरू केला होता. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, राणे यांच्या मृत्यूचे कारण मूत्राशयाचा आजार, मेंदूतील रक्तस्त्राव व मेंदूत रक्ताच्या गाठी असे नमूद करण्यात आले होते.

एचआयव्हीसारख्या संसर्गजन्य आजाराच्या बाबतीत रुग्णाच्या कुटुंबीयांना कल्पना देणे अत्यावश्यक असताना संबंधितांनी पत्नी किंवा मुलाला याची माहिती दिली नाही. त्यातच त्यांच्यावर या आजाराचे उपचार सुरू करण्यात आले. २०२२ मध्ये म्हापण येथे झालेल्या आरोग्य शिबिरात हा आजार आढळल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याबाबत कोणतीही कागदपत्रे कुटुंबीयांना देण्यात आली नाहीत. तसेच मृत्यूसमयी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या अहवालात एचआयव्हीचा उल्लेख नाही. त्यामुळे आधी केलेले निदान आणि उपचार यामध्ये मोठी तफावत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात ओसरगाव येथील जागृती फाऊंडेशन, निदान करणारे वैद्यकीय अधिकारी, उपचाराची चौकशी करणारे स्वयंसेवक तसेच ओरोस येथील जिल्हा रुग्णालय आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, या मागणीसाठी कुटुंबियांनी सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

error: Content is protected !!