आचरा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; मालवण तहसिलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते शुभारंभ
आचरा मंडल स्तरावर विविध महसूल सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध; लाभार्थ्यांना दाखले वितरण
आचरा (प्रतिनिधी) : तहसील कार्यालय, मालवण मार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत आचरा मंडळ स्तरावर आचरा हायस्कूल सभागृह येथे आयोजित समाधान शिबिराचा शुभारंभ तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकाचे काम अडू नये. नागरिकांनी प्रशासनाशी थेट संवाद साधत शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. महसूल विभागाच्या १५ सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे,जनजागृती करणे तसेच प्रशासकीय कामासाठी होणाऱ्या फेर्या कमी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरचे दाखले तीन ते चार दिवसात उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना ही श्री लव्हे यांनी प्रशासनाला दिल्या.
शिबिरादरम्यान उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, तसेच मालवण तहसीलदार गणेश लव्हे त्यांच्या हस्ते जातीचे, वय अधिवास, श्रावण बाळ, शिधा पत्रिका, उत्पन्न दाखला, प्रधान मंत्री घरकुल योजना, आयुष्यमान, आरोग्य पत्रिका, अद्ययावत सातबारा तसेच विविध लाभार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, हे अभियान सर्व सामान्य नागरिक, शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले. दुय्यम निबंधक प्रविण हिर्लेकर, भूमी अभिलेखचे मंगेश मालप, महसूल विभागाच्या मिनल चव्हाण, पुरवठा विभागाच्या निकस, आरोग्य विभागाकडून विवेक घाडगे, तालुका कृषी अधिकारी तसेच इतर विभागाकडून उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली.
शिबिरामध्ये अकृषक परवानगी व अकृषिक तरतुदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ७/१२ दुरुस्तीसाठी.-८ अर्ज स्वीकारण्यात आले. डिजिटल ७/१२ चे १२२ उतारे व ८ अ चे ५२ उतारे उपलब्ध करून देण्यात आले. फेरफारची २२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. विविध प्रकारची ६२२ प्रकरणे वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाला नायब तहसिलदार विनायक जांभेकर, पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, गणेश तोंडवळकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, तोंडवळी सरपंच श्रीमती तोंडवळकर, रामेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, स्थानिक संस्थाध्यक्ष फर्नांडिस, मुख्याध्यापक गुडूकडे, माजी सभापती हिमाली अमरे, जयप्रकाश परुळेकर, संजय मिराशी, निलेश सरजोशी, मंगेश टेमकर, प्रकाश मेस्त्री, दादा धुरी, अभय भोसले, उदय दुखंडे, तलाठी मंडल अधिकारी अजय परब, आकाश कराळे, शिरसाठ मॅडम, आचरा मंडल अधिकारी उमेश सिंगनाथ, ग्राम महसुल अधिकारी, मंडलातील तलाठी, मंडलातील पोलीस पाटील, शेतकरी, ग्रामस्थ आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक, स्वागत केतकी बांवकर यांनी तर सूत्रसंचालन, समारोप जिल्हा पोलिस पाटील संघटना अध्यक्ष सुनिल खरात यांनी केले.












