वाहतूक ठप्प ; पीआय सोनवलकर यांची घटनास्थळी धाव – वाहतूक सुरळीत
वैभववाडी (प्रतिनिधी) : अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे करूळ घाटात डिझेल व पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व महसूलची आपत्ती नियंत्रण यंत्रणा दाखल झाले आहे. या अपघातामुळे करूळ घाटातील वाहतूक सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.
सांगलीहून कसालकडे डिझेल व पेट्रोल घेऊन जाणारा टँकर एम एच 07 एस 1234 करूळ घाटातील एका धोकादायक वळणावर डोंगराकडील बाजूला पलटी झाला. या टँकर मध्ये 6 हजार लिटर पेट्रोल, तर हजार लिटर डिझेल होते. टँकर पलटी झाल्यामुळे डिझेल व पेट्रोल रस्त्यावरून वाहत होते. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,शैलेंद्र कांबळे, मोहन राणे, हरी जायभाय, संतोष माने, वैशाली कोलते, किरण मेथे, महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कानडे, योगेश लाड,महसूल विभागाचे नायब तहसीलदार दिलीप पाटील, शिवाजी सुतार,अमोल पाटील, श्री साठे, वैशाली साबळे,तलाठी कांबळे,श्री नागावकर यांच्यासह माजी उपसभापती भालचंद्र साठे, सह्याद्री जीव रक्षक टीमचे हेमंत पाटील, प्रकाश सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी मदत कार्य करीत होते.
पेट्रोल व डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे तातडीने वैभववाडी अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी बोलवण्यात आली आहे. तर कणकवली नगरपंचायतीचा अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाले होते. तर क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजू करण्याचे काम सुरू होते. घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे वैभववाडी कडून जाणारी वाहतूक करू चेक पोस्ट येथे तर कोल्हापूर करून येणारी वाहतूक गगनबावडा येथे थांबवण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहतूक ठप्प होती.












