24 तासाच्या आत घरफोडीचा गुन्ह्याचा उलगडा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरानजीक कलमठ गावात घरफोडी करून 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरणाऱ्या चोराला सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने अवघ्या 24 तासांत गजाआड केले आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील नंदकुमार तुकाराम साटम यांच्या घराच्या बाथरूम मधील 15 हजार रुपये किंमतीचे स्टीलचे नळ अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात 24 मार्च रोजी दाखल झाली होती. फिर्यादी नंदकुमार साटम यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दि. 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वा. ते दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या मुदतीत घडला होता. याबाबत दि. 24 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजून 59 मिनिटांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथकही करत होते. तपासामध्ये CCTV फुटेज प्राप्त झालेले होते. त्यावरून आरोपीचा शोध सुरू होता. तपासामध्ये सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी शंकर नवलाप्पा पवार, वय 68 वर्षे, रा. हिरज, जि. सोलापूर याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 25 मार्च 2026 रोजी सदर चोरट्याचा कणकवली पोलिस ठाणे हद्दीत कसून शोध घेत आरोपी शंकर नवलाप्पा पवार, वय 68 वर्षे, रा. हिरज, ता. व जि. सोलापूर याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले असून सिंधुदुर्ग एलसीबीने सदरचा गुन्हा हा 24 तासाचे आत उघड केला आहे.

सदर आरोपीने यापुर्वीदेखील सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे व कणकवली पोलिस ठाणे येथे घरफोडीचे गुन्हे केले असून महिनाभरापूर्वी तो जामिनावर जेलबाहेर आलेला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार गंगावणे यांनी केली आहे.

error: Content is protected !!