खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी नुकतीच खारेपाटण येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्याला सदिच्छा भेट देऊन या किल्ल्याची पाहणी केली. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात नोंद असलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण शहराला भेट देऊन मानला समाधान वाटले असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हाधिकारी धोंडमीसे यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांच्या समवेत प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, खारेपाटण पंचायत समितीचे सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, ग्रा. पं. सदस्य जयदीप देसाई, खारेपाटण पोलिस पाटील अनिकेत जामसंडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महसूल विभाग महाराष्ट शासन तहसील कार्यालय कणकवली यांच्या वतीने खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान टप्पा क्र. १ कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे खारेपाटण येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याला आवर्जून भेट दिली व किल्ला परिसराची पाहणी केली. विशेष म्हणजे येथील किल्ल्याला लागून असलेल्या भुयारी मार्गाची देखील प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी केली.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असलेल्या प्राचीन श्री देव सूर्यनारायणाच्या मूर्तीची देखील पाहणी व दर्शन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. खारेपाटण येथील श्री देव कपिलेश्वर मंदिरात ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली असून याच मंदिराच्या बाजूला खारेपाटणच्या इतिहासाच्या साक्ष सांगणाऱ्या शिलालेखातील विरगळा यांची देखील जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी पाहणी केली. खारेपाटण हे निसर्ग संपन्न व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले गाव असून पर्यटनाच्या धर्तीवर या गावाचा विकास करून या ऐतिहासिक वारसा जतन करणे काळाची गरज असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.













