राजाराम मराठे कृषी महाविद्यालयात विद्यार्थी गिरवताहेत स्वावलंबनाचे धडे
कणकवली (प्रतिनिधी) : राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण कार्यक्रम या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात कुक्कुटपालनाचे शिक्षण घेत आहेत.कृषी पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शासकीय तसेच खाजगी नोकरीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू करून स्वतःसाठी तसेच इतरांनाही रोजगाराचा पर्याय तयार करून त्यातून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे तसेच रोजगाराच्या शोधात युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवून त्यांना गावातच रोजगाराची सोय व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात विद्यार्थी कुक्कुटपालन या व्यवसायाशी निगडित पक्षांच्या निवारा शेडची उभारणी कशी करावी, कुक्कुटपालनामध्ये अंडी देणाऱ्या आणि मांसल पक्षांच्या विविध जाती आणि त्यांचा अभ्यास तसेच त्यांची निवड कशी करावी, पिल्ले आणण्याच्या अगोदर निवारा शेड ची स्वच्छता व शेडचे निर्जंतुकीकरण कसे करावे, वेगवेगळ्या हंगामात पिल्लांचे ब्रूडिंग कसे करायचे, पक्ष्यांचे विविध आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आजारांपासून संरक्षण करण्यासाठी पिल्लांचे लसीकरण केव्हा व कशा पद्धतीने करायचे, वाढी च्या दरम्यान त्यांच्या वयानुसार खाद्य व पाणी व्यवस्थापन कसे करायचे, पक्ष्यांच्या चोची केव्हा व कशा पद्धतीने कापाव्या तसेच त्याचे फायदे, तोटे काय आहेत, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती पद्धतीने खाद्य कसे तयार करावे आणि पक्षांना पूरक खाद्य म्हणून काय वापरता येईल त्या खाद्याचे उत्पादन कसे घ्यायचे, तसेच पूर्ण वाढ झालेल्या पक्षांची विक्री व विपणन स्थानिक व बाहेरील बाजारपेठेत कशा पद्धतीने करावी, खाजगी कंपन्यांबरोबर करार पद्धतीने करावयाचे कुक्कुटपालन त्यामधील संधी,जोखीम,फायदे, तोटे या सर्व गोष्टी विद्यार्थी या प्रशिक्षणातून अभ्यासणार आहेत.
या उपक्रमामध्ये चतुर्थ वर्षातील विद्यार्थी प्रगती जाधव, प्रमोद जाधव, प्रसाद काकडे,गणेश काळे, निकिता कावणेकर,रोहित कुलकर्णी शुभम कुंभार, समृद्धी कुराडे नम्रता महामुनी, एमडी मौलाना, हर्षद मिटके, प्रिया नागरगोजे,विजय नाईक, प्रतीक नलवडे,निर्मला परब अविष्कार पाटील, साईश्वरी निकम, वैष्णवी भोसले सिद्धेश पाताडे,आदित्य कोळेकर, गिरीश नाईक, अभिजीत पाटील, नंदणा, ज्योतिका कांदळे सहभागी झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक सुशील कुमार मोटे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सदर उपक्रमासाठी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट चे अध्यक्ष दीपेश मराठे,मिताली मराठे आणि सचिव विद्या राणे पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.












