फोंडाघाट मारुतीवाडी श्रीविठ्ठल मंदिरात रामजन्म भक्तिमय वातावरण आणि जल्लोषात संपन्न !

राम जन्माने राम राज्य यावे ! वाढती महागाई, भ्रष्टाचार यातून मुक्ती मिळून शासनाला जाग यावी.— फोंडावाशीयांचे श्रीरामाकडे साकडे !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दोन दिवसाच्या परिश्रमानंतर, पुरातन वारसा लाभलेल्या, फोंडाघाट- मारुतीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात ठीक बारा वाजता ढोल- ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, “श्री राम जय राम जय जय राम” च्या जयघोषात आणि देवचाफा व गुलालाच्या उधळणीत रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. छोट्याशा सजवलेल्या पाळण्यामध्ये प्रतिनिधीक दागिन्यांनी नटलेल्या श्रीफळाच्या रामप्रतिमेला पुरोहित भाई हिरलेकर दांपत्याने न्हाऊ माखू घातले. त्यानंतर अशोक शितोळे, विद्या म्हस्कर, संगीता सावंत, शालिनी हळदिवे,अपर्णा शितोळे, उज्वला पावसकर, जयश्री सावंत यांनी रामाला रामपाळणा गाऊन जोजविले. रामजन्म च्या वेळ उपस्थित अबाल- वृद्ध स्त्री – पुरुष सर्वांनी गुलाल व देवचाफ्याची उधळणीने वातावरण राममय झाले..

ह.भ. प. मुणगेकर – सामंत यांच्या वारकरी संप्रदायाने रामजन्म आधी — राम नाम ज्याचे मुखी | तो सदा सर्वदा होई सुखी || हा यशस्वी आयुष्याचा मंत्र आपल्या वारकरी भजनातून व्यक्त केला. यावेळी उपस्थित सर्वांना खोबरे- सुंठवडा प्रसाद देण्यात आला. त्यानंतर जवळच असलेल्या मारुती मंदिरामध्ये राम – हनुमान भेटीचा उत्साह मिरवणुकीतून दिसून आला.

सायंकाळी श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. रात्री उशिरापर्यंत स्थानिक भजन मंडळांनी आपली सेवा रुजू केली. यावेळी शितोळे परिवारातील शशिकला, दीपक, आनंद, दत्तकुमार, अशोक, वर्षा, राहुल, पराग, यासह सुरेश टक्के, सुभाष बिले, कुमार नाडकर्णी,संजय हळदीवे,बाळा डोरले, आप्पा सावंत, राजेंद्र मोरये, राजेश मरिये,भरत चिके, राजा शिरोडकर तसेच परिसरातील महिला पुरुष भावी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!