खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा – कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘सखी संवाद’ हा विशेष कार्यक्रम नुकताच येथील एचपीसीएल हॉलमध्ये अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. “लेकी महाराष्ट्राच्या, शिलेदार शिक्षक समितीच्या” या ब्रीदवाक्याला जागृत ठेवत, तालुक्यातील महिला शिक्षिकांनी या सोहळ्याला अभूतपूर्व गर्दी करत आपली संघटनात्मक ताकद दर्शविली.
हा कार्यक्रम जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर आणि कणकवली शिक्षक नेत्या नेहा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी तालुका अध्यक्षा दर्शना धीरज हुंबे आणि सचिव मयुरी हेमंत राणे यांनी सक्षम नेतृत्व केले. या सोहळ्याला जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे व अजय तांबे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, शिक्षक नेते टोनी म्हापसेकर, पतपेढी संचालक श्रीकृष्ण कांबळी, ऋतुजा जंगले व महेंद्र पावसकर, जिल्हा विभागीय अध्यक्ष किशोर गोसावी, जिल्हा संघटक ईश्वरलाल कदम आणि सचिव निलेश ठाकूर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
तसेच तालुका स्तरावरील पदाधिकारी तालुका कार्याध्यक्षा कविता उदय बुचडे, तालुका कोषाध्यक्षा आरती प्रसाद कांबळी व प्रकाश वाडकर, कार्यालयीन सरचिटणीस सुभाष गावकर, तालुका कार्यालयीन चिटणीस सविता आर्लेकर, संपर्कप्रमुख दिनेश जंगले, तालुका संपर्कप्रमुख रश्मी आंगणे, कनेडी विभागीय अध्यक्ष सुनील गावकर आणि तळेरे विभागीय अध्यक्ष अजय सावंत यांनी विशेष सहकार्य केले. यासोबतच प्रभाग स्तरावरून कणकवली प्रभाग उपाध्यक्षा वेदिका चव्हाण, फोंडा प्रभाग उपाध्यक्षा स्नेहल संदीप गोसावी, कनेडी प्रभाग उपाध्यक्षा अनुजा कदम, हुंबरठ प्रभाग उपाध्यक्षा स्नेहा संतोष राणे आणि तळेरे प्रभाग उपाध्यक्षा श्रीया गोसावी यांच्या परिश्रमातून हा सोहळा अत्यंत नेटका पार पडला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मीनाक्षी वरवडेकर यांनी केले. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या आनंददायी उपक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी केले. या स्पर्धेत महिला भगिनींनी मोठ्या आवडीने आणि उत्साहाने सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत ज्योत्स्ना गावडे यांनी प्रथम, श्रेया ठाणेकर यांनी द्वितीय तर स्वराशा कासले यांनी तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. विजेत्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
याच सोहळ्याचे औचित्य साधून ‘तिळगूळ समारंभ’ देखील पार पडला, ज्यामध्ये परस्परांना शुभेच्छा देऊन स्नेह वृद्धिंगत करण्यात आला. तालुक्यातील सर्व महिला भगिनींना एकत्रित आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून शेवटी मयुरी राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या आगळ्यावेगळ्या संवाद सोहळ्यामुळे महिला शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.











