150 वर्षांपूर्वीचा कागद उजेडात
कण्हेरखेडच्या शिंदे मंडळींनी दिले अधिकारपत्र
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाची पूजा शिंदे मंडळीच्या वतीने करण्यासाठी कण्हेरखेडच्या सर्व शिंदे मंडळींनी मिटके पुजाऱ्यांना पौरोहित्याचे अधिकार दिले. त्यासंबंधीचा सन १८७२ मधील मोडी लिपीतील कागद मिरज इतिहास संशोधक मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर उपलब्ध झाला आहे. मोडी लिपी अभ्यासक स्वरा मराठे यांच्या सहकार्याने या कागदाचे वाचन करण्यात आले. त्यातून जोतिबाच्या पूजेसंबंधी नवी महिती मिळाली आहे.
वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा हे महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. दर वर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा असते. जोतिबा हे कण्हेरखेडच्या शिंदे मंडळींचे कुलदैवत आहे. सन १७३० च्या सुमारास राणोजी शिंदे यांनी सध्या असलेले मंदिर बांधले. मंदिर परिसरात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. मंदिराच्या पूजेअर्चेसाठी इनामे दिली. कण्हेरखेडहून ग्वाल्हेरला गेलेल्या सरदार महादजी शिंदे व त्यांच्या वंशजांनीही वेळोवेळी जोतिबाच्या विकासासाठी मदत केल्याचे दिसते.
दरवर्षी कण्हेरखेडची शिंदे मंडळी येथे दर्शनासाठी येतात. कण्हेरखेडची ही शिंदे मंडळीं डोंगरावर आली असता त्यांचे स्वागत मिटके पुजारी यांचे कडून केले जाते. जोतिबाच्या पुजाऱ्यांपैकी मिटके पुजारी यांच्या माध्यमातून शिंदे भक्त मंडळी जोतिबाची पूजा, नैवेद्य करवून घेतात. हे मिटके कुटुंबिय शिंदे यांचे खासगी पुरोहित आहेत. कण्हेरखेडची शिंदे भक्त मंडळी मिटके पुजाऱ्यांकडूनच सर्व पूजा विधी करून घेतात. अनेक वर्षांची ही परंपरा आहे.
मिटके पुजाऱ्यांच्या या पूजेच्या अधिकाराबाबत पुष्टी देणारा सन १८७२ मधील मोडी लिपीतील एक कागद नुकताच उपलब्ध झाला आहे. त्याचे वाचन मोडी अभ्यासक स्वरा मराठे यांनी मोड़ीतज्ञ मानसिंग कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
कण्हेरखेड येथील शिंदे घराण्यातील सर्व प्रमुखांनी आपल्या घराण्याचे अधिकृत पुरोहित म्हणून जोतिबा डोंगरावरील नरसू राघोबा मिटके, रामजी मनाजी मिटके, बापू पिलाजी मिटके यांना पूजेचे अधिकार दिले आहेत. ज्या-ज्या वेळी कण्हेरखेड येथून शिंदे घराण्यातून भक्त येतील त्यावेळी मिटके कुटुंबांनी पौरोहित्य करावे, त्यांच्या वतीने पूजाअर्चा, नैवेद्य करावा, असे या अधिकार पत्रात म्हटले आहे. या पत्रावर कण्हेरखेड येथील २० प्रमुखांच्या सह्या आहेत. या अधिकार पत्राअन्वये आजही कण्हेरखेड येथील भक्त आणि ग्वाल्हेर येथील संस्थानिक मिटके पुजाऱ्यांकडूनच श्री जोतिबाची पूजा करवून घेतात.
काय म्हटलंय अधिकारपत्रात
सवस्थान श्री रत्नागिरी जोतलिंग येथील देव हे आमचे कुळस्वामी आहे. तरी वडिलोपार्जित आज पर्यंत तुमचे घरी येऊन पूज्या वगैरे नेवेद्य करीत आहे. त्याअन्वये हली आमचे कोणी वौंषाचे सिंदे मंडळीतील कुलस्वामीचे दर्शनास येतील, ते सदरहून लिहिल्याप्रमाणे तुमचे घरी येऊन पूज्या नेवेद्य करून जातील व तुम्हाखेरीज आम्हास दुसरा पुज्यारी कोणी माहित नाही व पूर्वी वडिलार्जित सिंदे सरकारात ही पुजारी तुम्हीच आहात.












