कोंडये मधील काजू चोरीचा एलसीबी कडून पर्दाफाश

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी चार आरोपींना केले अटक

कातकरी समाजातील तरुणांसह काजू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकावरही गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कोंडये गावातील वरचीवाडी येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे दोन टन तीन लाख वीस हजार रुपयांच्या काजू बियांच्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणने उत्कृष्ट कामगिरी करत संशयित आरोपींना गजाआड केले आहे. कातकरी समाजातील तीन आरोपी या गुन्ह्यात सहभागी असून त्यांनी किरण पोळी परिसरामध्ये काजू बीची विक्री केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या या धडक कामगिरीमुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. कोंडये येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर आणि विलास विठ्ठल तेंडुलकर यांची सात एकर क्षेत्रात काजू बागायत आहे. या बागायतीमध्ये एक हजार काजूची झाडे आहेत. तसेच पक्का चिरेबंदी शेतमांगर देखील बांधण्यात आला आहे. या शेतमांगरामध्ये त्यांनी काजू बियांचा साठा करून ठेवला होता. २२ मार्च रोजी दत्तात्रय तेंडुलकर सकाळी आठ वाजता कामगारांसह काजू बागेत आले होते. दिवसभर त्यांनी आणि त्यांच्या कामगारांनी काजू बागेतील काजू बिया गोळा केल्या आणि शेतमांगरामध्ये साठवून ठेवल्या. सायंकाळी साडे सहा वाजता शेतमांगराला कुलूप लावून तेंडुलकर हे कामगारांसह आपल्या कोंडये वरचीवाडी येथील घरी गेले होते. २३ मार्च रोजी दत्तात्रय तेंडुलकर सकाळी आठ वाजता आपल्या कामगारांसह काजू बागेत आले आणि काजू बिया संकलन सुरू केले. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते शेतमांगरामध्ये ते शेतीसाहित्य आणण्यासाठी आले त्यावेळी त्यांना शेतमांगराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसून आला. तर आत जाऊन पाहिले असता मांगरातील दोन टन काजू साठा गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर श्री. तेंडुलकर यांनी या चोरी प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयीताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आपली गोपनीय यंत्रणा कामाला लावली होती. असे कृत्य कोण करू शकतो? किंवा त्या अनुषंगाने तपास करत असताना काही महत्त्वाचे धागेदोरे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना लागले. त्यानुसार त्यांनी तपास काम करत असताना कातकरी समाजातील तरुणांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी पप्या सुनील पवार (26, गणपती साना कणकवली), संदीप सुरेश पवार (22, पाईप वडाचा पाट), बंटी स्वप्नील पवार (22, गणपती साना कणकवली) व ज्या गाडीतून या काजू बियांची वाहतूक केली त्या अनंत मधुकर परब पोईप या गाडी मालकाला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी काजू बियांची वाहतूक करण्याकरता वापरलेला टेम्पो देखील ताब्यात घेतला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसांडेकर, ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!