रत्नागिरी जिल्ह्यातील नौका; नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली

मालवण (प्रतिनिधी) : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. ही नौका जप्त करण्यात आली असून, सदर नौका सर्जेकोट मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत एलईडी लाईट्स वापरून मासेमारी नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. ३० मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास देवबाग-मालवण समोरील सागरी जलधी क्षेत्रात गस्त घालताना रत्नागिरी जिल्ह्यातील ‘भुवनेश्वरी’ IND MH 4 MM 3738 या LED लाइट्स प्रकाशझोत लावून उभ्या असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली. ही नौका जप्त करण्यात आली असून, सदर नौका सर्जेकोट मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आली आहे.

सदर नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी, मालवण यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही मोहीम राबवली. महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अंदाजे ११-१२ सागरी मैल अंतरावर सदरची नौका अनधिकृत एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून उभी असलेली आढळली. सदरच्या जप्त नौकेचे मालक महेश मनोहर आयरे, शिरगाव, रत्नागिरी हे आहेत.
नौकेवर तांडेलसह एकूण २ खलाशी होते. सदर प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्याकडे सादर केला जाणार असून सुनावणीनंतर नौका मालक आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे.
या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर, सावजी यांचे सहकार्य लाभले. मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दिशा निर्देशानुसार यापूर्वीही अनेक कारवाई
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दिशा निर्देशानुसार मत्स्यविभाग अवैध LED लाइट्स वापरून होणाऱ्या अवैध/अनधिकृत मासेमारीविरोधात कठोर भूमिका घेत आहे. यापूर्वीही अनेक नौका जप्त करून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे आणि या पुढेही अशा प्रकारे अवैध/अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या नौकांवर विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी सांगितले.













