न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये महावीर जयंती आणि योग शिबिराचा रंगला ‘सुवर्णसंगम’ सोहळा

भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा मार्ग हा योगातील चित्तशुद्धीचा भाग आहे – साहिल डोरले

फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट येथे भगवान महावीर जयंती आणि १५ दिवसीय विशेष योग शिबिराचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. जैन दर्शन आणि योगशास्त्र यांचा मेळ घालणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. नारिंगकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून फोंडाघाट मधील जैनज्ञातीबंधू प्रतिनिधी साहिल डोर्ले उपस्थित होते. व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, योग शिबिराच्या आयोजिका आर्या भोगले, प्रा. कुराडे, प्रा. अमरदीप वाळवे, महेश पेडणेकर, कांतीलाल गांगुर्डे आणि गौरव घुंगरड आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात योगाचे महत्त्व विशद करत भगवान महावीरांच्या ‘अहिंसा’ आणि ‘संयम’ या तत्त्वांची सांगड घातली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी महावीर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक ईश्वरी लाड, द्वितीय क्रमांक अर्णव भिसे तर तृतीय क्रमांक असमी चव्हाण यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्याचबरोबर, गेल्या १५ दिवसांपासून योग शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. योग शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या १५ दिवसांत त्यांना केवळ शारीरिक लवचिकताच मिळाली नाही, तर अभ्यासातही एकाग्रता आणि मानसिक शांततेचा अनुभवही आला.

प्रमुख अतिथी साहिल डोर्ले यांनी आपल्या मनोगतातून भगवान महावीरांनी दिलेला ‘अहिंसेचा’ विचार हा योगातील ‘चित्तशुद्धी’चाच एक भाग आहे. शालेय वयातच विद्यार्थिनींनी योगाची कास धरली, तर त्या भविष्यात कोणत्याही आव्हानाला खंबीरपणे सामोरे जाऊ शकतील, असे आपले मोलाचे विचार मांडले. अध्यक्षीय भाषणातून प्रा. नारिंगकर यांनी महावीरांनी जगाला दिलेल्या संदेशाचे विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. तुषार मसगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. गौरव घुंगरड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!