सावंतवाडीत फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडूनच झाडांची कत्तल
सावंतवाडी (प्रतिनिधी) : एरवी सर्वसामान्य शेतकरी किंवा गोरगरिबांने एखादे झाड तोडले तर कारवाई आणि चौकशीचा ससेमिरा पाठीशी लावणाऱ्या सावंतवाडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्किंग करण्याच्या नावाखाली सावंतवाडी वनविभाग कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तब्बल दहा हुन अधिक झाडांची कत्तल केली आहे. त्यात परिसरात असलेल्या वनविभागाच्या गार्डन मधील झाडांचाही समावेश आहे. या प्रकाराबाबत काही जागरूक वन कर्मचाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली असून वनअधिकारीच अशा प्रकारे राजरोसपणे झाडांची कत्तल करीत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल उपस्थित करत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी विचारले असता, त्यांनी आपण परिसराचा विकास करण्यासाठी ही झाडे तोडली आहेत. आपल्याला झाडे तोडण्याचे अधिकार आहेत. त्या अधिकारात आपण आवश्यक परवानग्या घेवून आपण झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणाची तक्रार आहे तर द्या, नंतर काय ते बोलू, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
सावंतवाडी येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात गेली अनेक वर्षे उभ्या असलेल्या तब्बल दहा हून अधिक झाडांची कत्तल केल्याचे चित्र दिसत आहे. त्यात अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बाजूच्या झाडांसह परिसरात असलेल्या उद्यानातील झाडांचा समावेश आहे तर दूसरीकडे तहसिलदार कार्यालयाच्या समोर असलेल्या कार्यालयाच्या परिसरातील झाडे यापुर्वीच तोडून त्या ठिकाणी पार्कीगची शेड बांधण्यात आली आहे. याबाबतची माहिती काही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.
याबाबत खात्री करण्यासाठी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणीचे चित्र विदारक होते. त्या ठिकाणी तब्बल दहा पेक्षा अधिक झाडे तोडलेली आहेत तर त्याचे बुंधे आणी ओंडके त्याच ठिकाणी टाकलेले आहेत या गंभीर प्रकाराबाबत उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची भेट घेवून चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपण अधिकारी आहोत. त्यामुळे विकासाच्या मुद्याला अनुसरून आपण कोणतीही झाडे तोडू शकतो. त्या ठिकाणी काही विकासाचे प्रकल्प करायचे आहेत. त्यासाठी ती झाडे तोडण्यात आली आहेत, यासाठी आवश्यक असलेली परवागनी सक्षम अधिकाऱ्यांकडुन घेतली आहे, त्यामुळे आमच्याकडे तशी कोणतीही लेखी तक्रार नाही. तुमचे काही म्हणणे असेल तर लेखी तक्रार द्या किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सांगितले त्या कर्मचाऱ्यांचे नाव सांगा आपण चौकशी करतो, असे सांगुन त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी वनविभागाच्या परिसरात मुबलक जागा आहे तसेच पार्किंग शेड यापूर्वीच उभारण्यात आली आहे. त्यामुळे गाड्यांचे पार्किंग या विषयासाठी झाडे तोडणे योग्य नाही, अशी त्यांना विचारणा केल्यानंतर कोठे काय करायचे हे मला सांगू नका, मी अधिकारी आहे. मला तशा प्रकारचे अधिकार आहेत. कोणाची तक्रार असल्यास लेखी द्या, अशा पध्दतीचे वरवरचे सांगू नका, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.












