बांदा (प्रतिनिधी) : कृषी दिनानिमित्त व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मडुरा शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी लहान विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करताना प्रत्यक्ष मदत करून त्यांना झाडे योग्य पद्धतीने कशी लावावीत याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून विविध प्रकारची फुलझाडे आणून शाळेचा परिसर हिरवागार करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवर म्हणाले, ” लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेणे आणि त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
कार्यक्रमात सहशिक्षिका हर्षदा तळवणेकर यांनी कृषी दिनाचे महत्त्व, शेतीचे आपल्या जीवनातील स्थान आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.











