दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा जोतिबा डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. या मंगलप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी जोतिबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पाच वाजता श्रींचा शासकीय अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. दुपारी बाराच्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी सासनकाठ्यांचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली. या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासनकाठीला पहिला मान देण्यात आला. त्यापाठोपाठ मौजे विहे (ता. पाटण), कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा) आणि कवठेएकंद (जि. सांगली) यांसह एकूण १०८ मानाच्या सासनकाठ्या ढोल-ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या होत्या. डौलाने नाचवल्या जाणाऱ्या या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल-खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती.

प्रशासनाच्या वतीने यंदाची यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांग, पार्किंग व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संपूर्ण यात्रा परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली, तर जे भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात आली होती. बैलगाड्या, खासगी वाहने आणि पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी डोंगरवाटा ओसंडून वाहत होत्या, ज्यामुळे अवघा जोतिबा डोंगर गुलाबी रंगाच्या छटेत आणि भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला.

error: Content is protected !!