वादळी पावसाचा तडाखा; उंबर्डे येथे घरावर झाड कोसळून मोठे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात बुधवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार वादळी पावसाने उंबर्डे गावातील अंजली विष्णू रामाणे यांच्या घरावर मोठे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गेल्या तीन-चार दिवसांपासून वैभववाडी तालुक्यात दमदार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांनी भात लागवड व इतर शेतीच्या कामांना वेग दिला आहे. मात्र बुधवारी दुपारी अचानक पावसाचा जोर वाढला आणि त्यासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली.
उंबर्डे येथे अंजली रामाणे यांच्या घराशेजारील मोठे झाड वाऱ्याच्या जोरदार तडाख्यामुळे थेट घरावर कोसळले. त्यामुळे घराच्या छपराचे मोठे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम सुरू केले.

दरम्यान, तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे भात लागवडीला पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. मात्र वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!