आचरा (प्रतिनिधी) : गुजरात राज्यातील तिलकवाडा या गावात पवित्र नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर चैत्र मासात होणारी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा अत्यंत भक्तिमय आणि दिव्य वातावरणात सुरू झाली झाली. यावेळी परिक्रमेचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज यांच्या पावन पादुकांचे आगमन.
पुण्यातील ऋषिकेश ओझा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हा अनमोल योग साध्य झाला. यावेळी श्री सद्गुरु शंकर महाराज अन्नछत्र समितीचे ट्रस्टी अविनाश भाऊ रेवडे हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.
ऋषिकेश ओझा हे गेली १४ वर्षे अखंडपणे या परिक्रमेत सहभागी होत असून, त्यांच्या प्रेरणेने विविध शहरांतून अनेक भक्त दरवर्षी या पवित्र परिक्रमेचा भाग बनत आहेत.
परिक्रमेची सुरुवात तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर येथे झाली. पादुकांच्या आगमनानंतर हेमंत आबा जोशी यांच्या हस्ते महाराजांच्या पादुकांचे विधीपूर्वक षोडशोपचार पूजन करण्यात आले. या वेळी परिसरात अत्यंत पवित्र आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर परिक्रमा पुढे निघाल्यावर स्वामी मठ येथे श्री सतीश कांबळे यांनी पादुकांचे स्वागत करून पूजन केले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
पुढे वासन गावातील वासुदेव आश्रम येथे स्वामी श्री विष्णुगिरी महाराज यांनी पादुकांचे स्वागत करून यथासांग पूजन केले. या ठिकाणीही भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
यानंतर दक्षिण तटावर असलेल्या प्राचीन धनेश्वर लुंकेश्वर मंदिरात आश्रमाचे महंत जानकी बापू यांनी पादुकांचे भक्तिभावाने स्वागत करून यथासांग पूजा केली. संपूर्ण परिक्रमे दरम्यान “नर्मदे हर” आणि “जय शंकर” या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.
श्रींच्या पादुकांसोबत परिक्रमेच्या प्रवासात विविध ठिकाणी भजन, आरती, नामस्मरण आणि पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा अद्वितीय संगम ठरलेल्या या परिक्रमेचा समारोप तिलकवाडा येथे पालखी सोहळ्याने आनंदाच्या वातावरणात झाला. आयोजक आणि सेवेकऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करत हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडला.












