फ्लोरेट कॉलेजचा आगाज फॅशन शो ठरणार लक्षवेधी

3 मे रोजी विद्यामंदिर हायस्कुल पटांगणावर आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : येथील फ्लोरेट कॉलेज आयोजित “आगाज फॅशन शो २०२६” हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक आगळावेगळा आणि सर्जनशील उपक्रम ठरणार आहे. फ्लोरेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेऊन विविध आकर्षक आणि कल्पक थीम्सवर आधारित गारमेंट्स तयार केले असून, त्या गारमेंट्सचे सादरीकरण या फॅशन शोमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण मॉडेल्स सहभागी होणार असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले गारमेंट्स आणि त्यामागील संकल्पना प्रेक्षकांसमोर सादर केल्या जाणार आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी कणकवली परिसरात झालेले अनेक फॅशन शो प्रामुख्याने मॉडेल्सचे प्रदर्शन किंवा ब्युटी पेजंट स्वरूपाचे होते. परंतु आगाज फॅशन शो २०२६ हा त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि संकल्पनात्मक आहे. या फॅशन शोचा मुख्य केंद्रबिंदू “गारमेंट डिझाईन” आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाईन केलेले गारमेंट्स, त्यामागील कल्पना आणि त्यांची सर्जनशीलता प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ मॉडेल्सचा शो नसून डिझायनर्सचा शो ठरणार आहे.

यामध्ये डिझायनर्समध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार असून, विविध थीम्स आणि डिझाईन्समधून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
तसेच या फॅशन शोमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित मेकअप आर्टिस्ट एकत्र येणार आहेत, ज्यामुळे या कार्यक्रमाला अधिक व्यावसायिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होणार आहे.

याशिवाय या कार्यक्रमाचे पूर्ण स्टेज डिझाईन आणि सजावट फ्लोरेट कॉलेजच्या इंटिरियर डिझाईन विभागातील विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ फॅशन शो न राहता फॅशन, मेकअप आणि इंटिरियर डिझाईन या तिन्ही सर्जनशील क्षेत्रांचा संगम ठरणार आहे. या फॅशन शोचा मुख्य उद्देश म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे, तसेच स्थानिक संस्कृती जपत फॅशन क्षेत्रात नवीन संधी निर्माण करणे हा आहे.

तसेच या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीस चालना मिळावी, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गारमेंट्सचा उपयोग पर्यटकांनी करावा, स्थानिक संस्कृती टिकून राहावी आणि तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांना अर्थार्जनाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे. या उपक्रमासाठी कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी विशेष सहकार्य दर्शवले आहे. कणकवली ही सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक परंपरेने समृद्ध नगरी असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे या शहराच्या सांस्कृतिक वैभवात अधिक भर पडणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवती, शैक्षणिक संस्था आणि फॅशन क्षेत्रात रस असलेल्या सर्वांनी “आगाज फॅशन शो २०२६” मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका सार्था कदम आणि नगराध्यक्ष मा. संदेश पारकर यांनी केले आहे. यावेळी सिने अभिनेते निलेश पवार, किशोर कदम उपस्थित होते. “आगाज फॅशन शो २०२६” हा केवळ एक कार्यक्रम नसून सिंधुदुर्गच्या तरुण डिझायनर्स, मेकअप आर्टिस्ट आणि इंटिरियर डिझायनर्स यांच्या प्रतिभेचा एक भव्य उत्सव ठरणार आहे.

error: Content is protected !!