निवतीसमोरील समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई; नौका जप्त

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने निवतीसमोरील समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई करत नौका जप्त केली आहे. दि. ४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) तसेच सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर हे नियमित गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.

गस्तीदरम्यान गोवा राज्यातील पणजी येथील पल्लवी साईहर्षद धोंड यांची ‘जय IV बॉस’ (नोंदणी क्र. IND-GA-2-MM-3588) ही नौका महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. संबंधित नौकेचा पाठलाग करून ती थांबवून कागदपत्रांची तपासणी केली असता आवश्यक विधीग्राह्य कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

तपासणीदरम्यान नौकेवर अवैध व अनधिकृत LED मासेमारीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. या नौकेवर तांडेलसह एकूण २० खलाशी असल्याची माहिती आहे. कारवाईदरम्यान नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे.

ही कारवाई सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन दाखल केले असून पुढील सुनावणी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या न्यायालयात होणार आहे.

error: Content is protected !!