कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब सावंतवाडी व नाथपै कॉलेज, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात एक दिवसीय फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वृद्धाश्रमातील शारीरिक हालचालींमध्ये (लकवा व लकव्यासारख्या आजारांनी) अडथळे निर्माण झालेल्या आजी-आजोबांना विद्यार्थ्यांनी विविध फिजिओथेरपी उपचार दिले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करून घेतला. उपचारांमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला. उपचारानंतर डॉ. अनघा यांनी आजी-आजोबांशी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत रुग्णसेवेचे महत्त्व आणि भविष्यातील जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबच्या सेक्रेटरी डॉ. अनघा, नाथपै कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. पियुष, कॉलेजचे कर्मचारी, सुमारे २० विद्यार्थी, दिविजा वृद्धाश्रमचे सेक्रेटरी संदेश सहदेव शेट्ये, परिचारिका अमृता इंदप, सायली तांबे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून, शेवटी उपस्थितांनी नाथपै कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे आभार मानले.











