सभापती हर्षदा वाळके यांची मासिक सभेत घोषणा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीच्या वतीने पुन्हा गावठी आठवडा बाजार पंचायत समितीच्या आवारात भरविला जाणार असल्याची घोषणा सभापती हर्षदा वाळके यांनी केली. कणकवली पं. स. ची मासिक सभा आज सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी वालावलकर यांच्यासह सर्व पं. स. सदस्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले की माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या कार्यकाळात सुरू झालेला गावठी आठवडा बाजार पुन्हा कणकवली पं. स. आवारात सुरू करण्यात येणार आहे. गावठी आठवडा बाजारच्या माध्यमातून ग्रामीण घरगुती उत्पादनांना तसेच सेंद्रिय खतांवरील गावठी भाजीपाला, फळे, फुले यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या काही दिवसांत गावठी बाजार संकल्पना कणकवली पं. स. आवारात राबविण्यात येणार असल्याचे सभापती वाळके यांनी सांगितले.












