बांदा (प्रतिनिधी) : भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात डिजिटल स्मार्ट बोर्डचे अनावरण करण्यात आले. भाजपचे आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून हा Intellectual Digital Board मंजूर करण्यात आला असून त्याचे हस्तांतरण व अनावरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अनावरण भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई व भाजप बांदा शहराध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, निलेश नाटेकर, प्रवीण देसाई, सिद्धेश महाजन आदी उपस्थित होते.
बांदा दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात खेमराज प्रशालेचा मोठा वाटा आहे. येथे माध्यमिक शिक्षणाबरोबरच कला, वाणिज्य, विज्ञान तसेच व्यावसायिक अशा उच्च माध्यमिक शाखांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक अध्यापन पद्धतीचा लाभ मिळावा या उद्देशाने हा डिजिटल स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यासाठी भाजपचे बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे पाठपुरावा करून ही सुविधा शाळेला मिळवून दिली. याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.यावेळी बोलताना श्वेता कोरगावकर यांनी बदलत्या काळातील शिक्षणपद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी या डिजिटल बोर्डचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षण अधिक परिणामकारक बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी माजी मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक, प्राचार्य प्रदीप देसाई, पर्यवेक्षक प्रमोद सावंत, उपप्राचार्या मिलन वसकर, शिक्षक अनिकेत सावंत, गंगाधर काळे, दीपा सावंत, आपा राऊळ, सचिन नाईक, शबाना खान तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणधीर रणसिंग यांनी केले तर आभार प्रमोद सावंत यांनी मानले. बदलत्या शिक्षण प्रवाहाचा विचार करून आमदार निरंजन डावखरे यांनी शाळेला ही आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.












