प्रगतीशील शेतकरी मंगेश कदम यांची कृषी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष व खांबाळे येथील प्रगतीशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या शाखेच्या अभ्यास मंडळावर “प्रगतीशील शेतकरी” म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.कुलगुरु यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे.

शेती क्षेत्रातील अनुभव व आधुनिक तंत्रज्ञान व प्रगत शेती यामध्ये केलेले काम याचा विचार करून त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अभ्यास मंडळाची सभा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. या सभांमध्ये शेतीविषयक अनुभव व मार्गदर्शनासाठी त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

मंगेश कदम यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मागील वर्षी प्राप्त झाला असून त्याचबरोबर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत.  
श्री. कदम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शेती पद्धतींचे प्रयोग केले असून ते यशस्वीपणे राबविले आहेत. सध्या कोकण फार्मर प्रोडूसर कंपनी मार्फत यांत्रिकीकरण योजना राबविली असून हळद लागवड, भात लागवड, नाचणी लागवड यंत्राच्या सहाय्याने करून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा करून देणार आहेत. या निवडीबद्दल वैभववाडी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!