ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आज पासून सुरू झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा समीक्षा चंद्राकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी १४ एप्रिल पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण संतोष चिकने यांनी केले आहे.
राज्यात ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ८ ते १४ एप्रिल या कालावधीत साजरा होत आहे. या कालावधीत जिल्ह्यात होणार आहे विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी समाजकल्याण कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा जात पडताळणी समिती उपायुक्त विशाल नाईक, समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी, सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश हुकिरे, प्रकल्प अधिकारी विजय कदम, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी उदय गायकवाड, संग्राम कासले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातील निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शीतल पवार, वैश्विका कदम, सानिका राऊळ यांना रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यात ८ ते १४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमा आयोजित करण्यात आलेले आहेत. याबाबत माहिती देताना समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकने म्हणाले, ९ रोजी विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रम शाळा, शासकीय वस्तीगृह , निवासी शाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर तसेच सन २०२६ हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे महाड येथील सत्याग्रह संबंधी व त्या अनुषंगाने मानवी हक्काचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , लघु नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत.
संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्त्व प्रतिपादन करणारे व्याख्यान,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,यांचे आयोजन करण्यात आले आहे.
११ रोजी २०२६ हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने त्यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करून यानिमित विविध स्तरावर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.१२ रोजी संविधान जागर कार्यक्रम होणार आहे. १३ रोजी ज्येष्ठ नागरिकांची जनजागृती शिबीर व नागरिकांचा मेळावा घेण्यात येणार आहे. स्वच्छता मोहीम राबविणे, रक्तदान शिबिर घेणे, जिल्हा जात पडताळणी कार्यालयात प्रमाणपत्र प्रदान करणे
१४ रोजी शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रम शाळा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीची ३९७ प्रकरणे प्रलंबित
मार्च २०२६ पासून सिंधुदुर्गनगरी येथील समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दाखल झालेल्या प्रकरणांपैकी ३९७ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. यामध्ये ९० प्रकरणे ही विद्यार्थ्यांची आहेत. अपूर्ण कागदपत्रे, कागदपत्रांची वेळेत पूर्तता न करणे यामुळे ही प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.












