गुरामवाड-कुमामे-गोळवण-मसदे रस्त्याची दुरवस्था; बीबीएम कार्पेट करण्याची ग्रामस्थांची मागणी

रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा

मालवण (प्रतिनिधी) : गुरामवाड, कुमामे, गोळवण आणि मसदे या गावांना जोडणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे नादुरुस्त झाला असून, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. केवळ खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत येणार नसल्याने या रस्त्यावर बीबीएम कार्पेट करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालवण येथील उपअभियंत्यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. सदर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून बीबीएम कार्पेट करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी कुमामे आणि गोळवण गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

error: Content is protected !!