देवगड (प्रतिनिधी) : बीएसएनएलच्या देवगड कार्यालयात २६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या चोरीप्रकरणी शंकर तायप्पा घोरपडे (३२) व बाबा शंकर घोरपडे (३०, दोन्ही रा. कराड, जि. सातारा) या संशयितांना देवगड पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांकडून ताब्यात घेतले. तपासिक अधिकारी यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण व इतर पुराव्यांद्वारे दोन्ही संशयितांकडे तपास केला असता संशयितांनी बीएसएनएलच्या देवगड येथील कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती देवगड पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत संचार निगम लि. च्या देवगड येथील कार्यालयात २५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ते २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वा. च्या कालावधीत अज्ञात संशयिताने सुमारे २८ हजार ८०० रूपये किंमतीचे एलसीसी कार्ड व कंट्रोलकार्डची चोरी केली होती. याबाबत सुधाकर शिवमूर्ती हिरामणी (५६, रा. भवानी कॉम्प्लेक्स, देवगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) नुसार अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव हे करीत होते. दरम्यान, दोडामार्ग येथील बीएसएनएल विभागाच्या कार्यालयात अशाच प्रकारच्या चोरीची घटना उघडकीस आली होती. या चोरीचा यशस्वी तपास करून दोडामार्ग पोलिसांनी शंकर घोरपडे व बाबा घोरपडे या संशयितांना १ एप्रिल २०२६ रोजी अटक केली होती. या दोन्ही संशयितांना सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या विशेष सूचनेनुसार व देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव व तपास पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, हवालदार गणपती गावडे, कॉन्स्टेबल प्रतिक जाधव, प्रसाद आचरेकर, रवींद्र महाले यांनी ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास देवगड पोलिसांकडून सुरू आहे.












