वागदे गोपुरी वसाहत मधील ग्रामस्थांसाठी दिली बोअरवेल
उन्हाळा अखेरीस जाणवणारी पाणीटंचाई केली कायमची दूर
कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांनी जनहिताचा स्तुत्य उपक्रम राबवून उन्हाळा अखेरीस जाणवणारी पाणीटंचाई कायम दूर केली आहे. वागदे गावातील गोपुरी वसाहत मधील नागरिकांना मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असे. ग्रामपंचायत माध्यमातून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडून गोपुरी वसाहत मधील ग्रामस्थांची गौरसोय होत होती. याबाबत तोडगा काढण्याची मागणी मागील 10 वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांची होती. वागदे सरपंच संदिप सावंत यांनी अखेर याबाबत पुढाकार घेऊन या समस्येवर कायमचा तोडगा काढला. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिल रोजी मध्यरात्री गोपुरी वसाहत येथे ग्रामपंचायत निधीतून बोअरवेल खोदून दिली. या बोअरवेलला मुबलक पाणी लागले असून त्यातून स्थानिक नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा केला जाणार आहे. यातून ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आता कायमची दूर होणार आहे. सरपंच संदिप सावंत यांच्या कार्यतत्परतेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी चंद्रशेखर काणेकर, लक्ष्मण काणेकर, बाळू मोरे, प्रकाश आरोलकर, रमाकांत आरोलकर, शशी आरोलकर, डीकवलकर, श्रीधर घाडीगांवकर आदी उपस्थित होते.











