जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा निर्णय
कणकवली (प्रतिनिधी) : थेट निवडणूकीतून सरपंचपदी निवडून आलेल्या कुडाळ तालुक्यातील झाराप सरपंच दक्षता दशरथ मेस्त्री यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूरीनंतर ग्रामसभेनेही ठराव मंजूर केला होता. त्याविरूद्ध दक्षता मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभेने मंजूर केलेला अविश्वास ठराव कायम केला आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या आठ ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दक्षता मेस्त्री या सन २०२२ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मनमानी, एकतर्फी कार्यपद्धतीच्याविरोधात नऊ सदस्यांपैकी उपसरपंच मंगेश गांवकर, तनया मांजरेकर, प्रियांका रेडकर, अमृता हरमळकर, संजिवनी पेंडूरकर, विजय हरमळकर, अश्पाक कुडाळकर व विशाखा गोडे या आठ सदस्यांनी तहसिलदार कुडाळ यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. त्यावर १० एप्रिल रोजी तहसिलदारांनी विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी हा ठराव आठ विरूद्ध दोन मतांनी मंजूर झाला होता. त्यानंतर २७ एप्रिल २०२६ रोजी कुडाळचे गटविकास अधिकारी पी. बी. बालावलकर व कणकवलीचे गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली. यावेळी ग्रामसभेला उपस्थित ७३९ ग्रामस्थांपैकी ३६६ ग्रामस्थांनी ठरावाला संमती दिली. तर ३४६ ग्रामस्थांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. यावरून २० मतांनी सदरचा ठराव मंजूर झाला होता.
याविरूद्ध सरपंच दक्षता मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. गटविकास अधिकारी यांनी विशेष ग्रामसभेसाठी अवलंबविलेल्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतले होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर सुनावणी होत विवाद अर्ज फेटाळत ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेला अविश्वास ठराव कायम करण्यात आला आहे.









