ओरोस (प्रतिनिधी) : मद्यप्राशन करून बेदरकारपणे ट्रक चालवत कंटेनरला धडक दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची जिल्हा न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश दिला.
या प्रकरणात कुडाळ पोलिसांनी आरोपीस अटक करून कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी आरोपीस प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सदर गुन्ह्यातील कलमे सेशन ट्रायबल असल्याने आरोपीच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक MH 04 MH 9667) घेऊन गोवा येथून भिवंडीच्या दिशेने जात होते. कुडाळ तालुक्यातील बिबवणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर आरोपीने मद्यप्राशन करून ट्रक (क्रमांक GJ 16 AY 1324) बेदरकारपणे चालवत कंटेनरला दोन वेळा जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत कंटेनर डिव्हायडरवर चढून रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला. या अपघातात फिर्यादी जखमी झाले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्तता मंजूर केली. या प्रकरणात आरोपीच्या बाजूने अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भूषण कदम आणि अॅड. निकिता हरकुळकर यांनी सहाय्य केले.











