स्पर्धेच्या युगात सकारात्मक विचारांची गरज – प्रा. लोखंडे यांचे प्रतिपादन

मंगेश लोके मित्रमंडळ व भाजपा खांबाळे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून योग्य दिशा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी तितकीच आवश्यक आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी खांबाळे येथे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिरात प्रा. सूर्यकांत लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.

मंगेश लोके मित्रमंडळ व भाजपा खांबाळे यांच्या वतीने आयोजित या शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रा. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सकारात्मक विचारसरणी, सातत्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यासावर परिणाम होतो व एकाग्रता कमी होते, याकडे लक्ष वेधत त्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला. वेळेचे नियोजन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कष्टातून आणि चिकाटीतून शिक्षण पूर्ण करत आई-वडिलांची स्वप्ने साकार करण्याचा ध्यास घ्यावा,” असेही त्यांनी नमूद केले.
या शिबिरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत शिबिर पार पडले.
यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, निवृत्त एसीपी प्रभाकर लोके व सहाय्यक कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले.

या प्रसंगी वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, माजी सरपंच प्राजक्ता कदम, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश लांबोर, ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, माजी उपसरपंच गणेश पवार, उमेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, महेश चव्हाण, दिनेश पालकर, जयेश पवार, श्रीकृष्ण पवार, गंगाधर पालकर, वायरमन योगेश परब, संकेश पवार, अनिकेत पवार, ग्रामपंचायत कर्मचारी एकनाथ रामकृष्ण पवार, सदानंद महादेव पवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!