कायमस्वरूपी नियोजन करा, सावंतवाडी पोलिसांकडे मागणी…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर घाटातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करा आणि नंतर त्यांना पुढे जाऊ द्या, अशी मागणी गेळे सरपंच तथा भाजपचे युवा नेते सागर ढोकरे यांनी केली आहे.
काही दिवसांनी वर्षा पर्यटन सुरू होणार आहे. त्यामुळे याबाबत कायमस्वरूपी योग्य ते नियोजन पोलिसांनी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी घाटातील रस्ते अरुंद आहेत. परवानगी नसताना सुध्दा त्या ठिकाणी अवजड वाहतूक केली जाते. त्याचबरोबर वाहनधारक भरधाव वेगाने येत जात असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसात तर हे प्रमाण खूप मोठे असते. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि संबंधित चालकाची तपासणी तसेच मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.












