कणकवली (प्रतिनिधी) : सोमवार दिनांक ८ जून रोजी महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ पुणे च्या सौजन्याने सावडाव गावातील सर्व आजी माजी विद्यार्थ्यांचा बाल मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला सावडाव सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण प्रभुदेसाई, ग्रामविकास अधिकारी श्रीमती भुजबळ, मासूम समन्वयक योगेश हुपरीकर, कोकण समन्वयक ऋतुजा कांबळे, अंगणवाडी सेविका रेश्मा जठार, आशा फाटक, श्रीम. पडवळ, मधुरा खोत, शाळेच्या शिक्षिका श्रीम. पवार मॅडम, वसंत कदम सर, ग्रामपंचायत सदस्या गौरी वारंग, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, बचत गटाच्या सीआरपी, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाने या बाल मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या कुमार वेद प्रभूदेसाई, इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कुमारी प्राजक्ता डगरे, द्वितीय पूर्वा डगरे आणि तृतीय क्रमांक कुमारी वैष्णवी तेली या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आठवणी जाग्या होऊन त्यांच्यामध्ये मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी होणे यासाठी अशा प्रकारचे उपक्रम हे काळाची गरज आहे. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास हा मराठी शाळेमधूनच होणार आहे. त्यामुळे मराठी शाळा टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अशी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. त्याचबरोबर या बालमेळाव्यात संविधान मूल्ये यांबाबत जाणीव जागृती पर उपक्रम राबवले गेले. धरतीची आम्ही लेकरे भाग्यवान धरतीची आम्ही लेकरे,….. स्वर्गात आकाशगंगा…. आभाळाची आम्ही लेकरे……या गाण्यांवर मुले मनसोक्त नाचली. या बाल मेळाव्याचे नियोजन महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) संस्थेच्या फेलो विभावरी कदम यांनी केले. या मेळाव्यासाठी अंगणवाडी सेविका रेश्मा जठार, आशा फाटक, गुरूदास काटे, बचत गटाच्या सर्व सदस्या, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष सहकार्य केले.












