उंबर्डे सुतारवाडी रस्ता प्रश्नावर उपोषण स्थगित; आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास २३ जूनपासून पुन्हा आंदोलन

वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे सुतारवाडी येथील रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर सुरू केलेले उपोषण उपसभापती साची कोलते व पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. मात्र, आठ दिवसांच्या आत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर २३ जूनपासून पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

उंबर्डे सुतारवाडीकडे जाणारा रस्ता एका व्यक्तीने अडविल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून हा रस्ता तातडीने खुला करण्याची त्यांची मागणी आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत उंबर्डे येथे उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने सोमवारी सकाळपासून पंचायत समिती वैभववाडी कार्यालयासमोर सुप्रसाद पांचाळ, विजय पांचाळ, शशिकांत पांचाळ आणि शुभम पांचाळ यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने आणि कक्ष अधिकारी बाबू देसाई यांनी चर्चा केली. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दुपारनंतर उपसभापती साची कोलते आणि सदस्य मंगेश लोके यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष उंबर्डे येथे जाऊन रस्त्याची पाहणी करण्यात आली.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, सरपंच वैभवी दळवी, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांच्या आत सभापती, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उंबर्डे ग्रामपंचायतीत संयुक्त बैठक घेऊन रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला मान देत ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत प्रश्न निकाली न निघाल्यास २३ जून रोजी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

error: Content is protected !!