सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तिलारी ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर चर्चा झाली. या योजनेसाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव तातडीने पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. या निर्णयामुळे शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, सावंतवाडी येथील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात पुनर्वसन विभाग व इतर आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ग्रामीण भागातील रस्ते विकासालाही प्राधान्य देत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच आणखी नवीन कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश आमदार दीपक केसरकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले. वेंगुर्ला तालुका क्रीडा संकुलाच्या विकासावरही भर देण्यात आला. येथे नवीन रनिंग ट्रॅक उभारणे, खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याचबरोबर, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका क्रीडा संकुलांसाठी प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय हॉल आणि विविध खेळांच्या मैदानांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. अद्ययावत सुविधा देताना बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचाही निर्णय झाला. बांदा तालुका क्रीडा संकुलासाठी तांत्रिक मान्यता घेऊन प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तिलारी पाणीपुरवठा योजनेतून सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन, कुंभार्ली, ब्राह्मणपाट व मळगाव या भागांना पाणीपुरवठा करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

















