सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी ( गट अ ) विकास पंडितराव चोरमले यांच्यावर चालू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रकाश शामराव शिंदे ( रा. महारुद्रा कॉम्प्लेक्स, कणकवली, मूळ रा. गारगोटी, भुदरगड, कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्री. देशपांडे यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. या गुन्ह्यातील फिर्यादी डॉ विकास पंडितराव चोरमले यांच्या फिर्यादीनुसार आरोपी प्रकाश शिंदे हा 16 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास स्वतःला अशक्त वाटत असल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी गेला होता. प्रकाश शिंदे याच्यावर ऑन ड्युटी अपघात विभागात कार्यरत असलेले डॉ. विकास पंडितराव चोरमले यांनी प्राथमिक उपचार करून प्रकाश शिंदे याची तब्बेत ठीक असल्याचे सांगून शिंदे याला घरी जाण्याचा सल्ला दिला. मात्र शिंदे घरी न जाता तो डॉ चोरमले यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करू लागला.घटनास्थळी हजर साक्षीदारांनी शिंदेला आवर घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर धावून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर आरोपी शिंदे हॉस्पिटलबाहेर गेला. काही वेळाने आरोपी शिंदे हा हातात चाकू घेऊन अपघात विभागात आला आणि डॉ चोरमले यांच्यावर चाकूहल्ला करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा घटनास्थळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी शिंदे याला पकडले. याबाबत डॉ चोरमले यांच्या फिर्यादीनुसार आरोपी प्रकाश शिंदे विरोधात बी एन एस च्या आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती, वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम 2010 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल करून शिंदे याला अटक करण्यात आली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रकाश शिंदे याने जामीन मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आरोपी शिंदे याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याबाबतीत गंभीर गुन्हा केला असून अद्याप तपास सुरू आहे, जामीन मिळाल्यास तपासात अडथळा येऊ शकतो. जामीन मिळाल्यास प्रत्यक्षदर्शी स्टाफ तसेच साक्षीदार यांच्याबाबतीत असाच किंवा आणखी गंभीर गुन्हा करू शकतो.आरोपीने चाकू त्याच्या गाडीतून आणला होता हे तपासात उघड झाले आहे. तो चाकू त्याने कोठून आणला, त्याच्या सोबत अन्य कोणी साथीदार आहेत काय, हा गुन्हा त्याने कोणाच्या सांगण्यावरून केला ? हा तपास सुरू आहे. आरोपी हा परजिल्ह्यातील असून तपासकामी तो आवश्यक वेळी हजर राहण्याची शक्यता कमी आहे.या गुन्ह्याचा तपास अद्याप बाकी असून जामीन मिळाल्यास आरोपी पुरावे नष्ट करेल. अद्याप या गुन्ह्याचे चार्जशीट न्यायालयात दाखल करायचे आहे. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्री. देशपांडे यांनी आरोपी प्रकाश शिंदेचा जामीन अर्ज नामंजूर केला.










