कोल्हापूर (प्रतिनिधी) : ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 देऊन गौरव करण्यात आला. दाजीपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र दत्तात्रय घुणकीकर यांना या राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या महान व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता पुणे स्वारगेट येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आयकर आयुक्त मुंबई डॉ. सचिन मोटे, भारत विभूषण पंजाब सरकार श्री दिगंबर तायडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे सौ. रुक्मिणीताई गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राम मांडुरके व अध्यक्ष अशोक गोरड उपस्थित होते. यावेळी ए. डी. फाउंडेशनच्या सकारात्मक विधायक व सातत्यपूर्ण वाटचालीबद्दल सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.
तसेच व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आयकर आयुक्त मुंबई डॉ. सचिन मोटे आणि इतर मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्षअशोक गोरड यांनी केले.
सामाजिक वन विभाग, सेवाभाव आणि सुसंस्कृत दृष्टिकोन या तीन आधारांवर उभे असलेले व्यक्तिमत्व म्हणजे शाहूनगर राजारामपुरी, कोल्हापूर वन व वन्यजीव रक्षण अधिकारी येथील श्री राजेंद्र दत्तात्रय घुणकीकर. जीवनामध्ये सर्व गोष्टी आपणच केल्या पाहिजेत असे नसते, त्यासाठी योजना व योजक योग्य असावा लागतो. असेच एक उत्तम योजक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याबरोबर एक आदर्श वैद्यकीय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्या कर्तृत्वाचा इतरांनाही नेहमीच आदर व अभिमान वाटतो ते म्हणजे आदर्श श्री राजेंद्र दत्तात्रय घुणकीकर. राजेंद्र घुणकीकर यांचे वन्यजीव समाज हितासाठीचे समर्पण, नेतृत्वगुण, नवोन्मेषी दृष्टिकोन, वन्यजीव रक्षण सेवा आणि
अनेकांच्या जीवनात दिलेली प्रेरणा व दिशा त्यांच्या याच कार्याचा आदर्श वन व वन्यजीव रक्षण अधिकारी म्हणून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात निवड झालेल्या सर्व पुरस्कार्थीना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ए. डी. फाउंडेशन समूहाच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता बागरेचा यांनी प्रभावीपणे करुन उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून समाजातील महान व्यक्तींच्या कर्तृत्वाला सलाम करणारा, प्रेरणादायी सोहळा ठरला. राजेंद्र घुणकीकर यांनी यापूर्वी कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सेवा बजावली असून या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.














