उपक्रमशील शिक्षक व गुणवंत विद्यार्थी शाळेचे आधारस्तंभ.- व्हिक्टर डाॅण्टस

चौके (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे औचित्य साधून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला . यावेळी व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना जिल्हा बँक संचालक तथा नवनिर्वाचित खरेदी विक्री संघाचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डाॅण्टस म्हणाले की, उपक्रमशील शिक्षक व गुणवंत विद्यार्थी हे शाळेचे आधारस्तंभ आहेत. ज्या शाळेत असे उपक्रमशील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी असतील ती शाळा नक्कीच यशोशिखरावर पोहोचेल. वराडकर हायस्कूलचा मी माजी विद्यार्थी व संस्थेचा सल्लागार मंडळातील सदस्य आहे याचा अभिमान आहे. शाळेच्या यशस्वीतेसाठी मी निश्चितच योगदान देईन. असे मत व्यक्त डाॅण्टस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गेले वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून आपापल्या विभागाच्या माध्यमातून नानाविध उपक्रम राबविलेल्या उपक्रमशील शिक्षकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वार्षिक परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी ,एन. एम .एम .एस. परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ,शासकीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, एसटीएस परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थी, एनसीसी विभागामार्फत आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेत मध्ये जिल्हास्तरावर निवड झालेली विद्यार्थिनी ,भाषा ,गणित विज्ञान, समाजशास्त्र ,क्रीडा , कला इत्यादी विभागामार्फत आयोजित विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विज्ञान शिक्षक तथा निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हाध्यक्ष प्रकाश कानुरकर यांच्या संकल्पनेतील “मुठभर धान्य व घोटभर पाणी पक्षांसाठी” या योजनेचा शुभारंभ करण्यात आला . गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की असे उपक्रमशील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी शाळेला लाभणे ही योगात्मा ,शिक्षण महर्षी काकासाहेब वराडकर यांची पुण्याई आहे . 2026 सालचा शाळेचा शतक महोत्सव संपन्न करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले .तसेच मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्माचारी विविध उपक्रम राबवित आहेत हे कौतुकास्पद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले . संस्था सचिव सुनिल नाईक यांनी मनोगत व्यक्त करतांना शाळेतील प्रत्येक शिक्षक आपुलकीच्या भावनेतून सतत क्रियाशील राहून प्रशाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत याचे विशेष कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी तथा उद्योजक प्रमोद पेडणेकर व मिठबावकर असोसिएटचे प्रवीण मिठबावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली . खरेदी विक्री संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते व्हिक्टर डाॅन्टस यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रम प्रसंगी सचिव विजयश्री देसाई ,खजिनदार रवींद्रनाथ पावसकर ,शालेय समिती अध्यक्ष बापू वराडकर संचालक महेश वाईरकर मुख्याध्यापक संजय नाईक वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डाॅ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक जमदाडे हे उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन संजय पेंडुरकर, वीणा शिरोडकर , किसन हडलगेकर यांनी केले. आभार प्रदर्शन रामकृष्ण सावंत यांनी केले.

error: Content is protected !!