इस्रो अंतराळ प्रदर्शन परीक्षेसाठी ७ जूनला परीक्षा; DTSE गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE) मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ तसेच सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी इस्रो अंतराळ प्रदर्शन परीक्षा रविवार, ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

लहान वयापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि स्पर्धात्मक वातावरणाची सवय लागावी या उद्देशाने दरवर्षी DTSE मार्फत तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. तसेच चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येते. परीक्षेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्रही दिले जाते.

DTSE परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ व सुवर्णपदक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने इस्रो अंतराळ प्रदर्शन, बेंगलोर येथे भेट देण्याची विशेष संधी उपलब्ध करून दिली जाते. यासाठी पात्र विद्यार्थ्यांची स्वतंत्र निवड परीक्षा घेतली जाते.

ही परीक्षा रविवार, ७ जून रोजी बारामती, शिरूर, तुळजापूर, वेळापूर, हडपसर आणि कणकवली या सहा परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो अंतराळ प्रदर्शन, बेंगलोर येथे भेट देण्याची संधी मिळणार आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या DTSE तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेत नर्सरी ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!