ठेकेदाराच्या मुजोरीला अधिकऱ्यांचा की नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त ?
नगरसेविका आर्या राणे यांचा सवाल
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला भूमिगत विजवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. परंतु खोदलेल्या रस्त्यावर तात्काळ कॉक्रीटीकरण करणे हे संबंधित ठेकदाराचे कर्तव्य असूनही ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्यावर केवळ माती पसरवली. त्यातच रविवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे खोदलेला रस्त्याचा सगळा चिखल उर्वरित रस्त्यावर आला आणि पादचारी तसेच वाहनचालकांना या चिखलातूनच रविवारी मार्गक्रमण करावे लागले. नागरिक आणि वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाची स्थानिक नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ योग्य ती कार्यवाही करून नागरिक तसेच वाहनचालकांना होणाऱ्या चिखलाच्या त्रासापासून मुक्ती द्यावी अशी आग्रही मागणी विजवीतरण अधिकाऱ्यांकडे केली आहे. पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर दरम्यानच्या रस्त्यावर भूमिगत विजवाहिनी चे काम करण्यासाठी 21 मे ते 30 मे दरम्यान रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक लक्ष्मी चित्रमंदिर पासून गांगोमंदिर रस्त्यावरून वळविण्यात येईल असे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले. दरम्यान मागील दोन दिवसांत विजवीतरणने भूमिगत विजवाहिनी टाकण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने रस्त्याच्या डाव्या बाजूला खुदाई केली. खुदाई केलेल्या रस्त्यावर केवळ खुदाईतील माती पसरवून ठेकेदाराने नागरिक तसेच वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. या ठेकेदाराच्या या मुजोरील विजवीतरण च्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे की कणकवली नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांचा ? असा सवाल उपस्थित करत नगरसेविका आर्या राणे याबाबत ठेकेदाराने योग्य ती दक्षता घेतली नाही तर भाजपा स्टाईल ने जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.















