ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : बिअरशॉपिचे लायसन्स व इमारत बांधकाम करण्यासाठी १ लाख ५५ हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही काम न केल्याने पैशाची मागणी केल्याच्या रागातून घोणसरी येथील विनोद विठोबा शिंदे यांच्या घरात घुसून त्याच्यासहीत पत्नी व शेजारी यांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी लोरे नं. १ येथील संजय अनिरूद्ध एकावडे, सुरेश परशुराम एकावडे, संतोष परशुराम एकावडे, मंगेश सुरेश एकावडे व जिजू सुरेश एकावडे यांची येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. २८ मे २०१६ रोजी सायं. ४ च्या सुमारास आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्याकडे बैठक झाली. यामध्ये बिअरशॉपीचे लायसन्स मिळविणे व इमारत बांधण्यासाठी संजय एकावडे याने फिर्यादीकडून घेतलेली रक्कम देण्याचे ठरले. त्यानंतर रात्री ११.३० वा. च्या सुमारास आरोपींनी बेकायदा जमाव करून फिर्यादीच्या घरी गेले. दरवाजा उघडला नाही, म्हणून दरवाजा तोडून घरात घुसले व दांड्याने मारहाण केली. तसेच त्याच्या पत्नीचे कपडे फाडले तसेच तीलाही मारहाण केली. शेजारी प्रकाश कारेकर हे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही लाकडी रिपीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर ठार मारण्याची धमकी देत आरोपी निघून गेले. याबाबत कणकवली पोलिसांत भादंवि कलम १४३, ३२५, ३२४, ३२३, ४२७, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुराव्याबाबत साशंकता, महत्वपुर्ण साक्षीदार न तपासणे आदी कारणास्तव आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.












