गढूळ पाणी मोना ओहोळात सोडले
ग्रामस्थ आक्रमक ; प्रशासन ढिम्म
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पियाळी गावात पोकलँड जेसीबी मशीनद्वारे बेसुमार अवैध सिलिका उत्खनन बिनदिक्कत सुरू असून महसूल प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे या बेकायदा व्यावसायिकांचा धीर चेपला आहे. मोना ओहोळात उत्खनन केलेल्या जागेतील वाळूमय पाणीसाठा रात्रीच्या अंधारात सोडला जात आहे. त्यामुळे जलप्रदूषण झाले असून मोना ओहोळातील पाणी वापरायोग्य राहिले नाही. याबाबत ग्रामस्थांनी कणकवली तहसिलदारांकडे तक्रार अर्ज करूनसुद्धा महसूल यंत्रणेने योग्य दखल घेतली नसल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मोना ओहोळ हा पियाळी आणि मठखुर्द या दोन गावांच्या मधून जातो. मोना ओहोळालगत पियाळी गावठाण परिसरात अवैध सिलिका उत्खनन सुरू असून त्याचे वाळूमय पाणी मोना ओहोळात सोडले जाते. त्यामुळे मोना ओहोळातील जलसाठा पूर्णतः खराब झाला असून वापरायोग्य राहिलेला नाही. मोना ओहोळ नदीच्या लगत मठखुर्द गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर आहे. या मंदिरात अभिषेक तसेच धार्मिक विधी केले जातात.मोना ओहोळ नदीपात्रातील पाणी अभिषेक तसेच धार्मिक विधीसाठी तसेच भाविक पिण्यासाठी करतात. मात्र सिलिका उत्खननानंतर साचलेले वाळूमय पाणी याच मोना ओहोळ नदीपात्रात सिलिका व्यावसायिक सोडत आहेत. त्यामुळे जलप्रदूषण होत असून यावर तात्काळ कडक कायदेशिर कारवाई करण्याची मागणी कणकवली तहसीलदारांकडे मठखुर्द ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.















