अखेर मोना ओहोळ नदीने घेतला मोकळा श्वास ; मठखुर्द ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त

नदीपात्रातील वाळूमय गाळ काढला

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोना ओहोळ नदीपात्रात सिलिका व्यावसायिकांनी वाळूमिश्रित सोडलेल्या पाण्यामुळे साचलेला गाळ काढण्यास शनिवार 23 मे रोजी सायंकाळपासून सुरुवात केली असून त्यामुळे मोना ओहोळ नदीपात्र आता मोकळे झाले आहे. पियाळी येथील सिलिका व्यावसायिकांनी उत्खनन केलेल्या सिलिका वाळू जमिनीतील साचलेले वाळूमिश्रित पाणी मोना ओहोळ नदीपात्रात सोडले होते. त्यामुळे नदीपात्रातील जलसाठा दूषित झाला होता. मोना ओहोळ नदी पियाळीसह मठखुर्द गावातून वाहते. मठखुर्द गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरातील अभिषेक सह अन्य धार्मिक विधीसाठी याच मोना ओहोळ नदीपात्रातील पाणी वापरले जाते. मात्र नदीपात्रात सोडलेल्या वाळूमिश्रित पाण्यामुळे नदीतील जलसाठा दूषित झाला होता. याबाबत मठखुर्द ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात आला होता. याबाबत आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवताच महसूल प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. त्यानंतर संबंधितांना तात्काळ नदीपात्रातील वाळू मिश्रित गाळ उपसा करण्याच्या सूचना केल्या. प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार तात्काळ मोना ओहोळ नदीपात्रातील सिलिका वाळू मिश्रित गाळ काढण्यात आला असून याबाबत मठखुर्द ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!