२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त होऊनही पोलिओ निर्मूलनाची स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियमित आयोजन करण्यात येते. त्यानुसार दिनांक २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात २७ हजार ८०६ बालकांना पल्स पोलिओ लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी डॉ धुरी यांनी आपल्या दालनात शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मठकर, डॉ कृपा गावडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ धुरी यांनी, या मोहिमेमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, उपकेंद्रे, अंगणवाडी केंद्रे, शाळा तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत. मोहिमेच्या दिवशी प्रथम बूथवर लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत घरभेटी घेऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येतील. स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या, बांधकामे, भटक्या वस्ती, साखर ऊसतोड कामगारांची वस्ती, झोपडपट्ट्या तसेच दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्वास कारणीभूत ठरू शकणारा आजार असल्याने प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना २८ जून रोजी जवळच्या पल्स पोलिओ बूथवर नेऊन पोलिओचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन डॉ धुरी यांनी केले आहे.

error: Content is protected !!