कणकवली (प्रतिनिधी) : वागदे, ता. कणकवली : वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून वागदे येथील मार्गेश्वर मंदिर परिसरात एसटी बस थांबा मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
कणकवली–सावंतवाडी राष्ट्रीय महामार्गावरील मार्गेश्वर मंदिर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली होती. या ठिकाणी ‘विनंती थांबा’ फलक उभारून एसटी बस थांबविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मार्गेश्वर मंदिर परिसरातील लोकवस्ती, प्रवाशांची गरज व वाहतुकीची सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी जवळील थांब्यांमधील अंतर कमी असल्याने प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर व स्थानिक गरजांची दखल घेऊन अखेर मंजुरी देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाने संबंधित आगारांना सूचना देऊन मार्गेश्वर मंदिर, वागदे येथे प्रवाशांना चढ-उतार करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या मंजुरीमुळे वागदे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.











